यश त्यालाच मिळते जो…

falling-100-times

“कंटाळा आला त्या यशाचा मला. बस्स झाले यश; आता अपयश पाहिजे मला.” असे म्हणणारा मनुष्यप्राणी मला अजून तरी सापडायचा आहे.
किंबहुना…ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. पण तरीही मिळते का हो हे यश किंवा यश मिळविण्याचे रसायन? की आयुष्यच एक अजब रसायन बनून जाते त्या यशाचा पाठलाग करता करता. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही किंवा धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही त्याप्रमाणे; सर्वच काही विचित्र.

यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते; अगदी लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. त्या यशासाठी आम्ही काहीही करायला तयार असतो. नाही का?

खरोखर हवे असते यश आम्हाला की त्या फक्त आणि फक्त तोंडाच्या वाफा असतात? स्वतःला खुश करण्यासाठी किंवा इतरांसमोर मिरविण्यासाठी? काहीतरी भव्य दिव्य करतोय हे दाखविण्यासाठी?
काही असेही असतात जे यश मिळविण्याची इच्छा व्यक्त करतात. मोठमोठी स्वप्ने पाहतात आणि बहुतेकवेळा ती स्वप्ने गाढ झोपेत असताना पडलेल्या स्वप्नांमध्येच पूर्ण करतात. त्या स्वप्नांचा वास्तवाशी कधीही काहीही संबंधच नसतो आणि जर असलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा अशी परिस्थिती.
आपल्या जीवनमरणाशी ती कधीच जुळलेलीच नसतात. ती स्वप्ने फक्त आणि फक्त आशादायी जीवनाचा भाग असतात. असे जीवन मिळाले किंवा तसे जीवन मिळाले तर आयुष्य खूपच सुंदर होईल वगैरे वगैरे. ते विश्वच वेगळे असते कारण तो स्वतःच्या मनाला बरे वाटण्यासाठी केलेला फावल्या वेळातला उद्योग असतो (खराखुरा नाही).

तसेही यश मिळविण्यासाठी ध्येय खेळण्यातला नव्हे तर तो खराखुरा असावा लागतो आणि ते मिळविण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. खूप साऱ्या इच्छा आकांक्षांचा त्याग करावा लागतो. अथक मेहनत करावी लागते. अक्षरशः रात्रीचा दिवस करून घाम गाळावा लागतो. काय वाटेल ते झाले तरी एकच ध्यास जे ठरवले ते मिळविणे. आणि निष्पन्न? कदाचित खूप काही किंवा कधीकधी काहीच नाही.

अशावेळी निराश होणे स्वाभाविक असतं पण हे देखील तेवढेच स्वाभाविक नाही का जर काही भव्यदिव्य घडवायचं असेल तर त्यासाठी तेवढा वेळ आणि तीच चिकाटी कायम असावी लागते. १०० वेळा पडलात तर १०१ वेळा पुन्हा उभे राहण्याची धमक असावी लागते.

कायम स्वरूपी दुय्यम स्थानावर येऊन कुंठीत आयुष्य जगण्यापेक्षा भव्यदिव्य घडविण्यासाठी आयुष्य पणाला लावणे कधीही चांगलेच. नाही का?
Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Cell – 7208112331
Email – info@searchlightwithin.com
Website – http://www.searchlightwithin.com
Facebook Page –  https://www.facebook.com/searchlightwithin/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*