संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो

आज राम नवमी म्हणजेच जगत कल्याणासाठी घेतलेला श्रीविष्णूचा सातवा अवतार.

RAMESHWARपण माझ्यामते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच.

राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम.

राम वनवासात असताना असंख्य संकटातील सर्वात मोठे संकट म्हणजे सर्वशक्तिमान अशा रावणाकडून सीतेचे अपहरण. सीतेवरील प्रेमाने राम विरह दुःखात नक्कीच बुडाला पण त्या दुःखाने वाहून न जाता त्याने सीतेचा शोध सुरु ठेवला आणि अखेर रावणाचा वध करून पुष्पक विमानाने अयोध्येला परतला.

पण हे सर्व नक्कीच एवढे सहजासहजी झालेले नाही कारण आयुष्यातली संकटे अशी सहजासहजी निस्तरता येत नाहीत. तसेही आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा ती एकटी-दुकटी कधीच येत नाहीत तर त्यांची शृंखलाच सुरु होते आणि बहुतेकवेळा ती संकटे एकत्रच डोक्यावर आपटतात. साधारण मनुष्य एकाच संकटाने भांबावून जातो किंवा बिथरतो. अशावेळी काय करावे तेही सुचत नाही. तिथे एवढी संकटे एकत्र आल्यानंतर काय अवस्था होते ती आपल्या पैकी बहुतेकांनी स्वतःच अनुभवलेली असतात त्यामुळे त्याबद्दल विस्तारपूर्वक लिहिण्याची नक्कीच आवश्यकता नाही आहे.

सीतेचा शोध घेताना हनुमान आणि सुग्रीवाच्या सहाय्याने रामाला रावणाशी लढण्यासाठी वानरसेना मिळाली. ती वानर सेना घेऊन श्रीराम रावणाच्या लंकेवर आक्रमण करायला तर निघाले पण त्या लंकेत पोहोचण्यासाठी साधारणपणे ३५ किलोमीटर एवढे अंतर समुद्रमार्गे कापायचे होते. जे केवळ अशक्य होते ज्याला आज आपण रामेश्वर म्हणतो त्या ठिकाणापासून लंकेपर्यंतचे अंतर होते हे. आजच्या युगातील इंजिनियर जे काम करण्यासाठी १०/१५ वर्षे घेतात तेच काम नलाने ३ दिवसांत पूर्ण केले. त्या सेतूसाठी वापरलेल्या सामग्रीचा उल्लेख रामायणामध्ये आहे. हे काम एकट्या नलाने करणे देखील अशक्य पण त्याला साथ होती संपूर्ण वानरसेनेची.

कुणाचेही सहकार्य मिळविण्यासाठी आणि त्यांनी तुमच्यावर जीव ओवाळण्यासाठी तुमचे नेतृत्व देखील तेवेढेच कणखर आणि कनवाळू असावे लागते. तिथे फक्त आपल्या एकट्याचाच  विचार न करता संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो त्याच्यासाठी बलिदान करायला कुणीही मागेपुढे पहात नाही. श्रीरामाचे संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठीच होते आणि तेवढेच प्रेरणादायी. संपूर्ण रामायणात ह्याची असंख्य उदाहरणे सापडतात. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी त्यांना अशीच मिळालेली नाही आहे.

लहान वयात त्यांना विश्वामित्रांकडून जीवनाचे धडे मिळाले आणि वयात येतायेता कितीतरी असुरांचा त्यांनी बिमोड केला होता. पण तरीही नावालाही त्यांना गर्व शिवला नव्हता. मन शांत आणि सदैव लोककल्याणासाठी तत्पर असा एक परोपकारी राजा. आज देखील रामराज्याची कामना लोकं उगाचच नाही करत.

समर्थ आणि महापराक्रमी योद्धा पण तरी देखील आपल्या ईश्वराची मनोभावे पूजा करणारा. आम्ही ईश्वराची पूजा-अर्चना सहसा त्याचवेळी करतो जेव्हा काही संकटे येतात किंवा जेव्हा देवाकडून काहीतरी हवे असते. जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करण्याचे बळ स्वतःमध्ये नसते तेव्हा तर देवपूजेची तीव्रता अधिक जास्त असते. पण सर्व सामर्थ्यवान अशी व्यक्ती जेव्हा देवासमोर माथा टेकते त्यावेळी ती कृतज्ञता असते, त्या ईश्वराच्या प्रती. तिथे कोणतेही मागणे नसते की कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. अशा व्यक्तीसाठी कुणीही काहीही करायला तयार असतो. ह्याचे ज्वलंत असे दुसरे उदाहरण म्हणजे आमचे शिवाजी महाराज. जशी वानरसेना श्रीरामासाठी प्राणपणाने लढली तसेच स्वराज्यासाठी एकेक मावळा प्राणपणाने लढला.

उसळलेला समुद्र जर पार करून जायचं असेल तर आमची हवा तशीही निघून जाईल आणि समोर रावणासारखा महाबलवान आणि महापराक्रमी योद्धा असेल तर आम्ही त्या समुद्रापर्यंत देखील पोहोचणार नाही. जर चुकून पोहोचलोच तर एवढा अक्राळविक्राळ समुद्र बघून त्या समुद्राला दुरूनच नमस्कार करून परत फिरू. पण श्रीरामांनी सर्व शक्तीनिशी रावणाचा पाडाव केला. ह्या कामात हनुमानासारखे कितीतरी सक्षम योद्ध्ये श्रीरामाला येऊन मिळाले होते आणि त्याचबरोबर शरण आला होता रावणाचा भाऊ बिभीषण. त्यामुळे रावणावर मिळविलेला विजय हा एकट्या श्रीरामाचा नक्कीच नव्हता तर तो सांघिक विजय (टीमवर्क) होता पण प्रेरणास्त्रोत्र मात्र प्रभू श्रीरामचंद्रच होते.

आम्ही एखाद्या संकटाने खचून जातो आणि अशावेळी संपूर्ण आयुष्याचाच बोजवारा उडतो. ते जर टाळायचं असेल तर श्रीरामाला नुसतं नमन करून त्यांची गोडवी गाण्याबरोबरच त्यांचे गुणधर्म देखील अंगीकारणे तेवढेच गरजेच आहे. संपूर्ण रामचरित्राकडे पाहिल्यास असे लक्षात येईल की आयुष्यात संकटे येणारच पण ती संकटे आल्यावर त्यांचा निकराने आणि संयमाने सामना केल्यास विजय आपलाच असतो.

||जय श्रीराम||

शैलेश तांडेल
Life Skills Trainer & Mentor
www.searchlightwithin.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*